बळीराम लक्ष्मण क्षेत्री सर मंगरुळशी एकरूप झालेलं व्यक्तिमत्त्व....
भावपूर्ण श्रद्धांजली...... काळ 1993 ते 1998 चा. आमच्या जडणघडणीचा.पान मंगरूळच्या पंचक्रोशीत उत्तम शिक्षण हेच संस्कार हे ब्रीद घेऊन कार्यरत नूतन विद्यालय ही शाळा. मंगरूळच्या मध्यभागी ती होती. शिक्षण,कला, साहित्य, क्रीडा, संगीत या क्षेत्रात शाळेच्या लौकिकास साजेसे असे शिक्षण शाळेतून मिळत होते. बोर्डिंगच्या माध्यमातून पान मंगरूळला सीमावर्ती गावखेड्यातील मुले कन्नड -मराठी असा भेद न करता गुण्यागोविंदाने धडपडत .... घरच्या हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करत शिकत होती. इथली बोली कन्नड असताना माय मराठीचा लळा आपल्या वाणीने आणि मृदू स्वभावाने विद्यार्थ्यांत रुजवणारे बळीराम लक्ष्मण क्षेत्री सर शेजारच्या देवीकवठयाचे. शिस्तीत वावरणारे, उंच अंगकाठी, साधेच कपडे, साध्याच वाहणा असा त्यांचा पेहराव. हातावर पोट असणारे, रानोमाळ भटकणारे , सामान्य कुटुंबातले, शेतकरी कुणब्याची पोर कशी शिकतील यांचा आंतरिक उमाळा बाळगणारे आमचे क्षेत्री सर. भटक्या विमुक्तांसोबत आमच्यासारख्या चळवळ्या पोरांना पुढल्या प्रवासासाठी मार्गदर्शन करणारे ते होते. शाळेतल्या प्रत्येक घटकाला हवे हवेचे असे व्यक्तिमत्व. शाळ...