आकाशवाणीशी जन्मजन्मांतरीचं नातं जपणारे मृदू व्यक्तिमत्व - कवी सुनील शिनखेडे
आकाशवाणी सोलापूर केंद्राचे सहायक संचालक आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर ३० सप्टेंबर २०२१ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्या निमित्तानं कवी सुनील शिनखेडे यांच्या विषयी…. मी सर्वप्रथम नमूद करेन 'सरांचं आणि आकाशवाणीचं नातं जन्मजन्मांतरीचं आहे' सत्तरच्या दशकात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी या गावी गुण्यागोविंदाने वाढताना सातवीत असताना बाल कविता लिहिणारा मुलगा, पुढे अकरावीत असताना मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांची मुलाखत आपले मार्गदर्शक प्राध्यापक रंजन जयस्वाल यांच्या प्रेरणेतून घेतो. घरची सुबत्ता असताना स्वबळावर नागपूरात ' तरुण भारत' मध्ये उमेदवारी करत शिक्षण पूर्ण करतो . पुढे कवितेच्या प्रांतात मुशाफिरी करत ' तरुण भारत' च्या दिवाळी अंकाचा संपादक म्हणून काम करताना १९८१च्या काळात कवी अनिल, डॉ. वि.भि.कोलते, कथाकार वामन चोरघडे, राम शेवाळकर, कवी ग्रेस, गझलकार सुरेश भट, डॉ. द. भि. कुलकर्णी, नाटककार महेश एलकुंचवार , आशा बगे, डॉ.आशा सावदेकर या सर्वांचा साहित्य सहवास त्याला लाभतो. पुढचा आकाशवाणीचा प्रवास तितक्याच आत्मविश्वासाने करत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आपल्या कार्याचा ठस...